Pune News: जागतिक स्तरावरील ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या सायकल स्पर्धेचा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा उद्या (शुक्रवार, 26 जानेवारी) पुण्यात रंगणार आहे. या आंतरराष्ट्रीय इव्हेंटचा समारोप शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य वाहतूक कोंडी आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा विचारात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शाळा आणि कंपन्यांच्या वेळेत मोठे फेरबदल करण्याचे आदेश दिले आहेत.
शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील बदल
दरम्यान, पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा उद्या फक्त दुपारी 12 वाजेपर्यंतच सुरू राहतील. 12 वाजेनंतर विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे, जेणेकरून दुपारच्या वेळी होणाऱ्या गर्दीत मुले अडकणार नाहीत. तथापी, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी परिसरातून स्पर्धेचा मार्ग जाणार असल्याने येथील सुमारे 6,000 कारखान्यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्योगांची दर गुरुवारी असणारी साप्ताहिक सुट्टी आता शुक्रवारी असेल. तथापी, गुरुवारी होणारे वीज देखभाल दुरुस्तीचे काम (शटडाऊन) आता शुक्रवारी करण्यात येणार आहे.
हेही वाचा – वाहतूक कोंडीत पुणे शहर जगात पाचव्या क्रमांकावर! पुणेकरांनी वर्षभरात रस्त्यावरच वाया घालवले १५२ तास
स्पर्धेचा मार्ग आणि अंतर
ही स्पर्धा बालेवाडी स्टेडियमपासून सुरू होऊन सुमारे 58 ते 75 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत बालगंधर्व रंगमंदिर येथे थांबेल. खेळाडू शाहूनगर, टेल्को रोड आणि स्पाईन सिटी चौक या मार्गावरून धावतील. बालेवाडी ते बालगंधर्व या दरम्यानच्या सर्व मुख्य रस्त्यांवरील वाहतूक काही काळासाठी वळवण्यात येणार आहे.
नागरिकांसाठी प्रशासकीय सूचना
प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, उद्या घराबाहेर पडताना वळवण्यात आलेल्या वाहतूक मार्गांची माहिती घेऊनच नियोजन करावे. विशेषतः पालकांनी शाळा सुटण्याच्या नव्या वेळेची नोंद घ्यावी. सध्या सासवड ते बारामती दरम्यान तिसरा टप्पा सुरू असून, उद्याच्या अंतिम टप्प्यासाठी पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


