पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीने कहर केला आहे. राज्याच्या बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा बरेच खाली घसरले असून नागरिकांना सकाळी-संध्याकाळी कडाक्याच्या थंडीला तोंड द्यावे लागत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत ४ डिसेंबरपर्यंत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर थंडीचा कडाका कायम राहणार आहे.
काल राज्यातील सर्वात नीचांकी तापमान धुळे जिल्ह्यात ७.५ अंश सेल्सियस नोंदवले गेले. त्याखालोखाल नाशिक, जळगाव, पुणे, औरंगाबाद, मालेगाव आदी भागांतही पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे.
थंडी आणि सकाळच्या दाट धुक्यामुळे विद्यार्थी, कामगार आणि रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते वाहतुकीवरही धुक्याचा परिणाम जाणवत आहे.
थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी गरम कपडे, शाल, मफलर, टोपी यांचा वापर करावा आणि गरजेनुसार शरीर उबदार ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही हवामान तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.


