पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसत असून, शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सूचक वक्तव्यानं चर्चांना आणखी बळ दिलं आहे. “झालं गेलं गंगेला मिळालं, आता एकोप्यानं काम करायचं आहे,” असं वक्तव्य अजित पवार यांनी केल्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
अजित पवारांचे वक्तव्य ठरले चर्चेचा केंद्रबिंदू
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असल्यामुळे पुढील काळात पक्षांचे विलीनीकरण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “मागचं सगळं विसरून पुढे जायचं आहे. साहेबांचं नेतृत्व हे नेहमीच पुढची दिशा दाखवणारं असतं.”
विलीनीकरणाच्या चर्चांना वेग
अजित पवारांच्या या विधानामुळे शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, याबाबत अद्याप शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
महापालिका निवडणुकीनंतर मोठा निर्णय?
राजकीय जाणकारांच्या मते, आगामी महापालिका निवडणुकांमधील यश-अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील दिशा स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठा निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


