पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवारांसह अधिकृत उमेदवारांनीही भाजपात प्रवेश केल्याने पुण्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत प्रचाराला वेग आला असतानाच, पुण्यात घडलेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे. संबंधित उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश करत भाजपच्या अधिकृत उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
कोथरुडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
पुणे महापालिका निवडणुकीत कोथरुड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मध्ये शिवसेना उबाठा गटाला हा मोठा धक्का बसला. प्रभाग क्रमांक ९ (ड) आणि (क) मधील उबाठा गटाचे बंडखोर उमेदवार महेश सुतार (ड), पूजा सुतार (क), नियोजन समितीचे सदस्य सुखदेव तापकीर, तसेच प्रभाग क्रमांक ११ (अ) मधील अधिकृत उमेदवार बाळासाहेब धनवडे, विद्यार्थी सेनेचे अमर गायकवाड आणि माजी नगरसेवक पैलवान दिलीपदादा गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
हा पक्षप्रवेश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमधील निवासस्थानी पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्व नव्या प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “हे पक्षप्रवेश भाजपसाठी अत्यंत उत्साहवर्धक आहेत. यापूर्वीच पक्षाचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील उमेदवार भाजपमध्ये आल्याने पक्षाची ताकद अधिक वाढली असून, ही महापालिका निवडणुकीतील भाजपच्या विजयाची नांदी आहे.”
या घडामोडींमुळे पुण्यातील महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे बळ मिळाले असून, ठाकरे गटासाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.


