Sharad Pawar : बारामतीत आज मोठा राजकीय आणि शैक्षणिक कार्यक्रम पार पडला. उद्योगपती गौतम अदानी यांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठानच्या वतीने उभारलेल्या देशातील पहिल्या अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स महाविद्यालयाचे उद्घाटन झाले. या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ला अदानी समूहाकडून मोठी आर्थिक मदत मिळाली आहे.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार रोहित पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आले. अदानी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. राहुल गांधी आणि काँग्रेसकडून सतत निशाण्यावर असलेले अदानी बारामतीत आल्यानंतर पवार कुटुंबीयांनी त्यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमात बोलताना गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. ते म्हणाले की शरद पवारांना सर्व क्षेत्रातील सखोल माहिती आहे. ते माझ्यासाठी आदरणीय आणि आदर्श आहेत. दीर्घकालीन राजकारणात शरद पवार यांनी मोठे सामाजिक कार्य उभारले आहे. शरद पवार हे माझे मार्गदर्शक आहेत असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
यापूर्वीही अदानी बारामतीत आले होते. तेव्हा शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत त्यांनी माहिती घेतली होती. महाविद्यालयाला परवानगी मिळाल्यानंतर ते पुन्हा बारामतीत आले आणि त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येऊन उभे राहिले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी गटांची युती फिस्कटली असताना हा कार्यक्रम झाला. मात्र बारामतीत शैक्षणिक कार्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याने राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अदानी आणि पवार कुटुंबीयांच्या या जवळीकाने राज्यातील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


