Team India Test Coach: घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 0-2 आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या 0-3 अशा लाजीरवाण्या व्हाईटवॉशमुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. कसोटी क्रिकेटमधील या सलग अपयशानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कसोटी संघासाठी नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू केल्याची माहिती समोर येत आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मणला ‘अनौपचारिक’ ऑफर
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिग्गज क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांची अनौपचारिक भेट घेऊन त्यांना कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत विचारणा केली आहे. मात्र, लक्ष्मण यांनी सध्या तरी या पदासाठी रस दाखवलेला नाही. ते सध्या बेंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे प्रमुख म्हणून काम पाहत असून, तिथेच राहण्यास त्यांनी पसंती दर्शवली आहे.
सध्याच्या प्रशिक्षकांचे भवितव्य टांगणीला?
भारतीय संघाच्या सध्याच्या मुख्य प्रशिक्षकांचा करार 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत आहे. मात्र, कसोटीतील खराब कामगिरीमुळे या करारावर मुदतपूर्व पुनर्विचार होऊ शकतो. बीसीसीआय आता ‘स्प्लिट कोचिंग’ (वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळे प्रशिक्षक) या पर्यायाचा गांभीर्याने विचार करत असल्याचे चिन्हे आहेत.
2026 चा टी-20 विश्वचषक ठरणार टर्निंग पॉईंट
प्रशिक्षकांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय हा 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकातील कामगिरीवर अवलंबून असेल. जर भारतीय संघ हा किताब राखण्यात यशस्वी ठरला, तर सध्याच्या प्रशिक्षकांचा कार्यकाळ कायम राहू शकतो. अन्यथा, कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी स्वतंत्र प्रशिक्षक नेमले जातील.
खेळाडूंमधील असुरक्षिततेची भावना आणि शुभमन गिलचा पेच
राहुल द्रविडच्या कार्यकाळात खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत होता. मात्र, सध्याच्या व्यवस्थापनाखाली खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याची चर्चा आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे शुभमन गिल. त्याला अचानक टी-20 संघाचा उपकर्णधार करून पुनरागमन देण्यात आले, पण कामगिरीत सातत्य नसल्याने त्याला 2026 च्या टी-20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. अशा निर्णयामुळे संघात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


