बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. अंत्यसंस्कारानंतर आज अजित पवारांच्या अस्थी गोळा करण्यात आल्या.
विद्या प्रतिष्ठान परिसरात आजही भावनिक वातावरण पाहायला मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वतः उपस्थित होते. त्यांनी अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन घेतलं. या प्रसंगी पार्थ पवार, जय पवार, रोहित पवार, राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी राज्य सरकारने CID चौकशीचे आदेश दिले असून, तपास एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने सुरू आहे. प्राथमिक अहवालानुसार लँडिंगदरम्यान रनवे स्पष्ट न दिसल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
विमान अपघाताची CID चौकशी
राज्य सरकारने अजित पवारांच्या विमान अपघाताची CID चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बारामती पोलिसांना अपघातस्थळावर कोणालाही प्रवेश न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाचा तपास एक्सिडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) च्या अनुषंगाने केला जाणार असून, फॉरेन्सिक पथकाने आधीच घटनास्थळावरून आवश्यक नमुने तपासासाठी गोळा केले आहेत.


