पुणे : आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांची (शरद पवार व अजित पवार) पुन्हा एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मात्र ठाम विरोध दर्शवला आहे. “कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गटाशी युती करायची नाही, जर अशी युती झाली तर मी राजकारणातून काही काळ विश्रांती घेईन,” असा निर्वाणीचा इशारा जगताप यांनी दिला आहे.
जगताप यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “काही दिवसांपासून पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा आहे. पण ही युती फक्त तिकडच्या चार लोकांना आणि आमच्या दोन लोकांना फायदा व्हावा या संकुचित भावनेतून होत असेल, तर मी या प्रक्रियेपासून पूर्णपणे अलिप्त राहीन आणि राजकारण थांबवेन.”
जगतापांच्या या भूमिकेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी प्रशांत जगताप यांना थांबवण्यासाठी मैदान मारले आहे. धंगेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्ट व माध्यमांशी बोलताना म्हटले,
“प्रशांतदादा जगताप हे पुण्याच्या राजकारणातील लढवय्या कार्यकर्ते आहेत. जेव्हा जेव्हा पुण्यात चुकीचे घडले तेव्हा त्यांनी बिनधास्त आवाज उठवला. आता पवारसाहेब आणि अजितदादा काय निर्णय घेतील हे त्यांनाच माहीत, पण एक पुणेकर म्हणून माझी विनंती आहे की प्रशांतदादांनी असा निर्णय घेऊ नये. पुण्यनगरीची अजून खूप सेवा त्यांच्या हातून बाकी आहे.”
दरम्यान, अजित पवार गटातील काही नेते या युतीसाठी अत्यंत सकारात्मक असल्याची माहिती आहे, तर शरद पवार गटातील काही स्थानिक नेतेही युतीला अनुकूल आहेत असे बोलले जात आहे. मात्र प्रशांत जगताप यांच्या ठाम विरोधामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीचे गणित आता अधिक गुंतागुंतीचे झाले आहे.


