पुणे: मध्य रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुट्ट्यांसाठी विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये पुणे नागपूर आणि दौंड- कलबुर्गी दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा समावेश आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कुटुंबासमवेत किंवा मित्र-मंडळींबरोबर बाहेरगावी, तसेच पर्यटनस्थळी रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते. त्यामुळे आरक्षण केंद्रावर तिकीट बुकिंग सुरू होताच रेल्वे तिकीट वेटिंगवर जाते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी आणि नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी या सर्व रेल्वे गाड्या येत्या ४ एप्रिलपासून २१ जूनपर्यंत नियोजनानुसार सोडण्यात येणार आहेत.
पुणे-नागपूर- पुणे साप्ताहिक अति जलद वातानुकूलित विशेष गाडीच्या ८ एप्रिल ते २४ जून दरम्यान एकूण २४ फेऱ्या होतील. साप्ताहिक विशेष (ट्रेन क्रमांक ०१४६९) गाडी पुणे येथून दर मंगळवारी दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता ट्रेन नागपूरला पोहचणार आहे.
वातानुकूलित विशेष (ट्रेन क्रमांक ०१४७०) ग्राडी नागपूर येथून दर बुधवारी सकाळी आठ वाजता सुटणार असून, पुणे येथे त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पोहचणार आहे. या गाडीला तीन द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ सामन्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक वॉन आणि १ जनरेटर व्हॅन असणार आहे.
पुणे-नागपूर- पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्यांच्याही २४ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी (ट्रेन क्रमांक ०१४६७) ९ एप्रिल ते २५ जूनदरम्यान आठवड्याच्या दर बुधवारी पुणे येथून दुपारी ३ वाजून ५० मिनिटांनी सुटणार असून, नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पोहचणार आहे. साप्ताहिक विशेष (ट्रेन क्रमांक ०१४६८) १० एप्रिल ते २६ जूनदरम्यान आठवड्याच्या दर गुरुवारी सकाळी आठ वाजता नागपूर येथून सुटणार असून, पुणे येथे त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पोहचणार आहे. या गाडीला एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, दोन तृतीय वातानुकूलित, ५ शमनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे. या गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.


