SSC HSC Exam 2026 : दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
‘MBSSAE’ मोबाईल ॲपद्वारे अधिकृत माहिती
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना अचूक, अधिकृत आणि ताजी माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी राज्य मंडळाने ‘एमबीएसएसई’ (MBSSAE) हे अधिकृत मोबाईल ॲप विकसित केले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत राज्य परीक्षा मंडळाने आता डिजिटल माध्यमांचा अधिक प्रभावी वापर सुरू केला आहे.
परीक्षा, निकाल, सूचना सर्व काही एका क्लिकवर
परीक्षा वेळापत्रक
निकाल
महत्त्वाच्या सूचना
परिपत्रके
ही माहिती राज्य मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप आणि सोशल मीडिया अकाउंट्सवरून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी राज्य मंडळाची अधिकृत सोशल मीडिया खाती सबस्क्राईब करून अपडेट राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षांसाठी विशेष सूचना
आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षांच्या काळात महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी याच डिजिटल माध्यमांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे सर्व शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि सचिव डॉ. दीपक माळी यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे निर्देश
या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले असून, सर्व शाळा व महाविद्यालयांनी ही माहिती आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे स्पष्ट निर्देश राज्य मंडळाकडून देण्यात आले आहेत.


