पुणे: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांतील सातबारा उताऱ्यावर भूसंपादनाचे शेरे मारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच यासंदर्भात शेतकऱ्यांच्या काही हरकती-सूचना असतील, तर त्या लेखी स्वरुपात नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. आलेल्या हरकतींवर संबधित भूसंपादन अधिकारी सुनावणी घेऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकणार आहे. या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अधिनियम १९६२ च्या कलम ३२ (२) ची अधिसूचना नुकतीच जाहीर केली आहे.
पुरंदर विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी तीन उपजिल्हाधिकारी यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर या अधिकाऱ्यांकडून भूसंपादनाची ३२ (२) ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार भूसंपादन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाण्याचा व पाहणी करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. आता संबधित गावातील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर बंधणे घालण्यात आली आहे. आता जमिन मालकांना भूसंपादनाची नोटीसा बजावण्यात येत आहे. यानुसार शेतकऱ्यांना याबाबत हरकती संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्याकडे नोंदविण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
एखतपूर, खानवडी आणि मुंजवडी या तीन गावांतील शेतकऱ्यांना २५ मे पर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. तर वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण आणि पारगाव या चार गावांतील शेतकऱ्यांना २९ मे पर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. शेतकऱ्यांनी विमानतळाबाबत केलेल्या हरकतींवर संबंधित अधिकारी सुनावणी घेणार आहेत.
विमानतळासाठी सर्वाधिक क्षेत्र पारगावमधील संपादित होणार
पुरंदर विमानतळासाठी सात गावांपैकी सर्वाधिक क्षेत्र हे पारगावमधील संपादित होणार आहे. या गावातील १ हजार ५४२ सर्व्हे नंबरमधील ९७२ हेक्टर जागा संपादित होणार आहे. त्या खालोखाल खानवडी गावातील ३८१ सर्व्हे नंबरमधील ४५१ हेक्टर जागा, कुंभारवळणमधील ४२४ सर्व्हे नंबर बाधित होत असून या गावातील ३४१ हेक्टर क्षेत्राचे संपादन होणार आहे. वनपुरी गावातील ३६२ सर्व्हे नंबर बाधित होत असून त्यातील ३३० हेक्टर जमीन, उदाचीवाडीमधील १९९ सर्व्हे नंबरमधील २४० हेक्टर जमीन, एखतपूरमधील १४५ सर्व्हेनंबर बाधित होत असून त्यातील २१४ हेक्टर आणि मुंजवडीमधील २२१ सर्व्हे नंबरमधील १२२ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.


