पुणे : पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारपणाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे पुण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. ‘पुण्याचा सबसे बडा खिलाडी – सुरेश कलमाडी’ ही ओळख त्यांनी आयुष्यभर जपली.
त्यांचे पार्थिव आज दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन कन्या, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
कोण होते सुरेश कलमाडी?:
१ मे १९४४ रोजी जन्मलेल्या सुरेश कलमाडी यांनी पुण्यातील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. १९६० मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश केला आणि १९६४ मध्ये जोधपूर येथील फ्लाइंग कॉलेजमध्ये हवाई दलाचे प्रशिक्षण घेतले. १९६६ ते १९७२ या काळात त्यांनी भारतीय हवाई दलात सेवा बजावली.
राजकारणात प्रवेश केल्यानंतर १९७८ मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. अवघ्या ३८ व्या वर्षी, १९८२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. पुढील तीन दशके पुण्याच्या राजकारणावर त्यांचा ठसा राहिला. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी रेल्वेमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.
२०१० नंतर मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले. या प्रकरणात त्यांना राजकीय विरोध, राजीनाम्याची मागणी आणि सुमारे नऊ महिन्यांचा तुरुंगवासही सहन करावा लागला.
पुण्यावर मजबूत पकड:
एक काळ असा होता की ‘कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी’ असे समीकरण प्रचलित होते. पुणे महापालिकेवर कलमाडी गटाचे वर्चस्व होते आणि अनेक निर्णय थेट कर्वे रोडवरील दोन मजली ‘कलमाडी हाऊस’मधून घेतले जात. विमानतळावर त्यांचे आगमन झाले की स्वागतासाठी जणू जत्राच भरायची.
झुलत्या खुर्चीत बसून सूत्रे हलवणारे कलमाडी, पदांची वाटणी, राजकीय समीकरणे ठरवणारा तो काळ अनेकांना आजही आठवतो. पुणे फेस्टिव्हलसारख्या उपक्रमांमुळे शहराच्या सांस्कृतिक जीवनालाही त्यांनी भव्य रूप दिले. हेमा मालिनी, अमरीश पुरी, गुरुदास मान ते जगजित सिंगपर्यंत अनेक नामवंत कलाकार त्या मंचावर अवतरले. सुरेश कलमाडी यांच्या जाण्याने पुण्याच्या राजकारणातील एक प्रभावी, अविस्मरणीय पर्व संपुष्टात आले आहे.


