मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या बारामतीतील विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या दुर्घटनेनंतर अपघाताच्या कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असून, उच्चस्तरीय चौकशीची मागणीही जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बारामती विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे अपघात झाल्याचे सांगितले जात असताना, दूरवरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान स्पष्टपणे दिसत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. “जर धुक्याचं वातावरण होतं, तर सीसीटीव्हीत विमान घिरट्या घालताना इतकं स्पष्ट कसं दिसतं?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील यांनी मौन का बाळगले आहे, असा प्रश्नही अंधारेंनी उपस्थित केला. “हे केवळ पवार कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान आहे,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, शरद पवार यांनी हा निव्वळ अपघात असल्याचे स्पष्ट केले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र दिले आहे. तरीही या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होतच आहेत.


