पुणे : शिवसेना पक्षात २०२२ मध्ये झालेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात निर्माण झालेल्या वितुष्टाच्या पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित वळण आले आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण नगरपरिषदेत ठाकरे आणि शिंदे गटांच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उमेदवारी अर्ज भरला. यामुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीपूर्वी शिंदे गटाने आंतरिक रणनीती मजबूत करण्यासाठी आमदार-खासदारांना इशारा दिला आहे.
चाकणमध्ये ठाकरे-शिंदे एकजूट
चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे एकत्र उपस्थित होते. ही घटना स्थानिक राजकारणात खळबळ उडवणारी ठरली. याबाबत बोलताना बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले की, हे कोणतेही राजकीय गठबंधन नसून, दिवंगत आमदार सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून घेतलेले पाऊल आहे.
सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला असून, हे फक्त नगराध्यक्ष पदापुरते मर्यादित आहे. उद्धव ठाकरे आणि संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांना निर्णय घेण्याची मुभा दिली आहे.
मात्र, तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीमध्ये ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे काळे यांनी सांगितले. ही घटना कोकणातील कणकवलीसारख्या इतर भागांतील संभाव्य एकजुटीच्या चर्चांना खतपाणी घालते, जिथे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या अफवा आहेत.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पक्षाच्या आमदार, खासदार आणि नेत्यांसोबत बैठक बोलावली. या बैठकीत काही आमदारांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याच्या प्रयत्नांमुळे पक्षातील इतर नगरसेवकांच्या कामात अडथळा येत असल्याच्या तक्रारींवर शिंदे यांनी नाव न घेता कानपिचक्या दिल्या. पश्चिम उपनगरातील काही विभागप्रमुख आणि माजी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती, यामुळे पक्षांतर्गत कलह वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले की, निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांना ताकदीने पाठिंबा देण्याची जबाबदारी आमदारांची आहे. “मोठ्या विश्वासाने ते आपल्यासोबत आले आहेत, त्यांना पश्चात्ताप व्हायला नको. शेवटी आपण आपली माणसं मोठी केली तर पक्ष मोठा होईल आणि पक्ष मोठा झाला तर आपणही मोठे होऊ,” असे म्हणत शिंदे यांनी एकजुटीचे आवाहन केले.


