Pune Pay and Park : पुण्यातील रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडीला कायमचा अटकाव करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता ‘पे अँड पार्क’ अस्त्र उपसण्याच्या तयारीत आहे. तब्बल ७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रशासनाने या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून, शहरातील ६ प्रमुख रस्त्यांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली आहे.
पार्किंगची नवी नियमावली आणि दर
नव्या धोरणानुसार, दुचाकीस्वारांना प्रति तास ४ रुपये पार्किंग शुल्क भरावे लागणार आहे. महापालिकेने या सहा रस्त्यांवर एकूण ६,३४४ दुचाकी आणि ६१८ चारचाकी वाहनांच्या पार्किंगची क्षमता निश्चित केली आहे. चारचाकी वाहनांच्या शुल्काबाबतचा निर्णय अद्याप प्रशासकीय स्तरावर प्रलंबित असला, तरी या संपूर्ण प्रकल्पातून महापालिकेला वर्षाकाठी १२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
पुणेकरांची सर्वात जास्त गर्दी असणाऱ्या खालील रस्त्यांवर हे नियम लागू होतील:
- लक्ष्मी रस्ता
- जंगली महाराज (JM) रस्ता
- फर्ग्युसन कॉलेज (FC) रस्ता
- बालेवाडी हायस्ट्रीट
- विमाननगर रस्ता
- बिबवेवाडी मुख्य रस्ता
का घेतला हा निर्णय?
लक्ष्मी रस्त्यासारख्या व्यापारी भागात अनेक दुकानदार आणि त्यांचे कर्मचारी सकाळीच आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. यामुळे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगसाठी जागाच मिळत नाही. याशिवाय, शहरात सुमारे २ ते ३ लाख बेवारस वाहने रस्त्यांच्या कडेला वर्षानुवर्षे पडून आहेत. या मक्तेदारीला लगाम लावून सर्वसामान्यांना हक्काची पार्किंग मिळावी, यासाठी वाहतूक पोलिसांनीही या धोरणाचा पाठपुरावा केला होता. दरम्यान, धोरण निश्चित झाले असले तरी, निविदा प्रक्रियेला कंत्राटदारांकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे निविदा भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.


