Municipal Corporation Election 2025: आगामी महापालिका निवडणुका 2025 लक्षात घेऊन महायुतीतील पक्षांनी रणनीती ठरवायला सुरुवात केली आहे. प्राप्त माहितीनुसार मुहायुतीतील प्राथमिक फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नागपूरमध्ये भाजपा आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र येऊन उमेदवार उभे करणार आहेत. तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र वेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे.
पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा-राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांची ताकद जवळपास सारखी असल्याने युतीपेक्षा स्वतंत्र लढतीचा पर्याय पुढे आला आहे. स्थानिक पातळीवरील बंडखोरी, तिकीट वाटपातील नाराजी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी या सगळ्यांचा विचार करून दोन्ही पक्षांनी स्वतंत्र रणनीती आखल्याचे समजते. दरम्यान, नागपूरात भाजपाचे वर्चस्व स्पष्ट असले तरी, मैत्री टिकवण्यासाठी शिवसेना शिंदे गटालाही प्रमुख भूमिका देण्याची तयारी आहे. नवी मुंबईचा निर्णय अद्याप प्रलंबित असला, तरी भाजपा-सेना एकत्र येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
हेही वाचा – Municipal Elections: महापालिका निवडणुकीच्या तारखेबाबत मोठी अपडेट! कधीपासून लागणार आचारसंहिता?
भाजपाची उमेदवार निवड व निवडणूक पॅटर्नमध्ये मोठा बदल
महापालिका निवडणुकांसाठी भाजपा नव्या शैलीत उमेदवार निवड आणि रणनिती राबवण्याच्या तयारीत आहे. नगर परिषद निवडणुकांमध्ये काही ठिकाणी बाहेरून नेमलेल्या प्रभारींनी तिकीट वाटपात मनमानी केल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या. त्यानंतर भाजपाने यावेळी अधिक शिस्तबद्ध आणि स्थानिक पातळीचा आवाज ऐकणारी पद्धत स्वीकारण्याचे संकेत मिळत आहेत. विजय निश्चित नसलेल्या प्रभागांत इतर पक्षांतले प्रभावी चेहरे किंवा सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तींनाही संधी देण्यात येणार आहे. या सर्व हालचालींमुळे आगामी महानगरपालिका निवडणुका राजकीय दृष्ट्या अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.


