Municipal Elections Date: राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 डिसेंबरला होणार असून, दोन्ही टप्प्यांचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर केले जातील. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मतमोजणी 3 डिसेंबरला होणार होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे ती पुढे ढकलण्यात आली.
टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार महापालिका निवडणुका
याच पार्श्वभूमीवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आणखी एक महत्त्वाची घोषणा समोर आली आहे. नगर परिषद व नगर पंचायत प्रक्रियेचा समारोप अद्याप झालेला नसतानाच महानगर पालिकांच्या निवडणुकांचे वेळापत्रक निश्चित झाले आहे. राज्यात महापालिका निवडणुका 15 डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. प्रथम ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील मनपांची निवडणूक होईल, त्यानंतर ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील महापालिका निवडणुका पार पडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा – मनपाच्या 72 पैकी 18 थकबाकीदारांनी भरले 50 लाख ! फेरलिलाव प्रक्रिया राबविण्यासाठी कर विभागाकडून नियोजन
15 डिसेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू होणार
विशेष म्हणजे, मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या प्रमुख महानगर पालिकांच्या निवडणुका एकाच कालावधीत घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. त्यामुळे 15 डिसेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागू होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्वी निवडणूक आयोगाने महानगर पालिका निवडणुका सर्वांत शेवटी घेण्याचे संकेत दिले होते. मात्र, आता नगर परिषद आणि नगर पंचायत मतमोजणीनंतर थेट महानगर पालिकांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय पुढे आला आहे. परिणामी, राज्यातील सर्व मोठ्या महापालिका ताब्यात घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषकरून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक यंदाही सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. यावेळी ठाकरे बंधू एकत्र आल्याचे चित्र दिसत असल्याने ही निवडणूक अधिकच रोचक आणि चुरशीची होणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


