नाशिक : शहरातील अनेक मिळकतधारकांकडे मोठ्या प्रमाणावर कर थकबाकी असूनही तिचा भरणा केला जात नसल्याने मनपा कर विभागाने थकबाकीदार मिळकतींचा जाहीर लिलाव निश्चित केला. मात्र, यातील एकाही लिलावाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता कर विभागाकडून संबंधित थकबाकीदारांना कर भरण्याबाबत दुसऱ्यांदा विक्री नोटीस बजावली जाणार आहे. यानंतरही थकबाकी न भरल्यास मिळकतींसाठी फेरलिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.
विक्री नोटिसा मिळाल्यानंतर ७२ थकवाकीदारांपैकी सात जणांनी पूर्णतः तर ११ थकबाकीदारांनी अंशतः थकबाकी भरली. त्यामुळे मनपाच्या तिजोरीत ४९ लाख ६२ हजार रुपये जमा झाले आहेत.
कर विभागाने पहिल्या टप्प्यात शहरातील ७२ बड्या थकबाकीदारांच्या मिळकतींचा लिलाव सहाही विभागीय कार्यालयांमध्ये २ ते ४ जुलै या कालावधीत ठेवला होता. मात्र, लिलाव प्रक्रियेत कोणीही सहभाग न घेतल्याने ती यशस्वी झाली नाही. महापालिकेला घरपट्टीतून चांगला महसूल मिळतो.
मागील वर्षी कर विभागाने २५७ कोटीची घरीपट्टी वसूल केली. चालू घरपट्टीसह थकबाकी वसुलीकरिता विभागाकडून कर सवलत तसेच शास्ती माफीसारख्या उपाययोजना राबविल्या जातात. त्यानंतरही थकबाकीदारांकडून घरपट्टी भरण्याकडे पाठ फिरवली जात असल्याने थकबाकीचा डोंगर वाढतच आहे. थकबाकी वसुली व्हावी यासाठी कर विभागाने आता संबंधित मिळकतधारकांच्या मिळकतींचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश कर विभागाचे उपायुक्त अजित निकत यांनी सर्व विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत
विभागनिहाय थकबाकी वसुली अशी (लिलावानंतर)
सातपूर: चार लाख ९९ हजार २८५
सिडको: दोन लाख १५ हजार ४०५
नाशिक पूर्व : १६ लाख ७० हजार ४२४
नाशिक पश्चिम: पाच लाख ६० हजार १०
पंचवटी: तीन लाख ३४ हजार ८७९
नाशिकरोड: १६ लाख ८१ हजार ४९५
एकूण : ४९ लाख ६२ हजार ४९८


