नवी दिल्ली: ‘उदयपूर फाईल्स कन्हैयालाल टेलर मर्डर’ या चित्रपटाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता २१ जुलैपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. या चित्रपटाचाबत घेण्यात आलेल्या आक्षेपांवर सरकार काय निर्णय घेते त्याची प्रतीक्षा करावी, असे न्यायालयाने निर्मात्याला सांगितले आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. जोयमाला बागची यांच्या पीठापुढे हे प्रकरण आहे. त्यांनी चित्रपट निर्मात्याला सांगितले की, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कन्हैयालाल टेलर खून प्रकरणातील आरोपींना त्यांच्या कथित बदनामीबद्दल भरपाई देता येणार नाही, पण निर्मात्याला मात्र पैशाच्या स्वरूपात भरपाई मिळू शकते. जमियत उलेमा ई हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदानी यांनी केलेल्या याचिकेवरून दिल्ली उच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनास १० जुलै रोजी स्थगिती दिली आहे. त्याला चित्रपट निर्मात्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सिनेमॅटोग्राफ कायद्यानुसार, सरकार जोवर या चित्रपटाबाबत निर्णय घेत नाही तोवर ही स्थगिती असले, असे उच्च न्यायालय म्हणाले होते. त्यासाठी सरकारला आठवड्याची मुदत दिली आहे.


