गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली असून येत्या काही महिन्यांत वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य परिणय फुके यांनी गोंदिया जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गोंदिया जिल्ह्यात ५० एमबीए क्षमतेचे उच्चदाब रोहित्र नादुरुस्त झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हे संयंत्र मोठे असल्याने लगेचच नवीन रोहित्र उपलब्ध करून देता आले नाही. त्यामुळे तात्पुरती उपाययोजना म्हणून २५ एमबीए क्षमतेचे रोहित्र बसवण्यात आले आहे. मात्र, यामुळे काही प्रमाणात विजेचा विस्कळीत पुरवठा होत आहे. हे लक्षात घेऊन नवीन ५० एमबीए क्षमतेचे रोहित्र बसवण्याचे काम सुरू असून ते २२ जुलैपर्यंत पूर्ण होईल.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून देवरी येथे १०० एमबीए क्षमतेचे नवीन ईएचव्ही सबस्टेशन उभारण्यात येत आहे. त्यासोबतच दुसरे एक ईएचव्ही सबस्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पार पडली असून ३० जुलैपर्यंत वर्क ऑर्डर दिली जाईल. पुढील दीड वर्षात हे काम पूर्ण होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


