पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत ग्रामीण राजकारणातून आलेल्या नेत्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गेल्या आठ वर्षांत पुणे जिल्ह्यातील 34 गावांचा महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्याने या भागांमध्ये प्रथमच महापालिका निवडणुका होत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीत काम केलेले तब्बल 11 माजी प्रतिनिधी यंदा थेट पुणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे (वाघोली), स्वाती टकले (उंड्री), अनिता इंगळे (कोंढवे-धावडे), जयश्री भूमकर (धायरी), सुरेखा धमिष्ठे (धायरी) यांचा समावेश आहे. तसेच हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती वसुंधरा उबाळे (वाघोली), माजी उपसभापती बंडू खांदवे (लोहगाव), पिसोळी गावच्या माजी सरपंच स्नेहल दगडे आणि गुजर-निंबाळकरवाडीचे माजी सरपंच व्यंकोजी खोपडे हेही महापालिकेची निवडणूक लढवत आहेत.
यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले सुरेश कदम, बापूसाहेब पठारे तसेच पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय धनकवडे हे पुणे महापालिकेत निवडून आले होते आणि पुढे महापौरपदापर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शंकरराव उरसाळ आणि जिल्हा परिषद सदस्य नामदेवराव मते यांनीही महापालिकेत येऊन महत्त्वाची पदे भूषवली होती. अलीकडच्या काळात हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय धनकवडे हे पुण्याचे महापौर झाले होते आणि यंदाही ते निवडणूक मैदानात आहेत.
यंदाच्या निवडणुकीत सुरेखा धमिष्ठे यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारी दिली आहे. रामदास दाभाडे आणि जयश्री भूमकर यांना भाजपकडून, स्वाती टकले यांना शिंदे गटाकडून, तर अनिता इंगळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)कडून उमेदवारी मिळाली आहे. वसुंधरा उबाळे आणि बंडू खांदवे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी देण्यात आली आहे.
तसेच माजी सरपंच स्नेहल दगडे आणि व्यंकोजी खोपडे यांना भाजपने उमेदवारी दिली असून वाघोलीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य अर्चना कटके आणि मुंढवा-केशवनगरच्या माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना कोद्रे यांच्या कुटुंबातील व्यक्तीही निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
ग्रामीण भागातील प्रशासकीय अनुभव आणि स्थानिक संपर्क यांच्या जोरावर हे उमेदवार महापालिकेत कितपत प्रभाव टाकतात, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.


