Today Winter Temprature : महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची लाट सक्रिय झाली आहे. उत्तरेकडून येणारे शीत वारे राज्यात वाहू लागल्याने हुडहुडी भरली असून अनेक ठिकाणी शेकोट्या पेटवण्याची वेळ आली आहे. हवामान विभागाने (IMD) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित राज्यातही गारठा कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
उत्तर भारतातील थंडीचा जोर महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. काल नोंदलेल्या तापमानानुसार, धुळे येथे राज्यातील सर्वात कमी ५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहमदनगरमध्ये ६.५, गोंदिया ८.०, पुणे ८.४, मालेगाव ८.२, नागपूर ८.२, यवतमाळ ८.५, परभणी आणि बीडमध्ये प्रत्येकी ८.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. जळगाव ९.०, नाशिक ९.२, वर्धा ९.४ अंशांपर्यंत तापमान खाली आले आहे.
तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आल्यास किंवा सरासरीपेक्षा ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर ६.५ अंशांपेक्षा जास्त घट झाल्यास तीव्र थंडीची लाट घोषित केली जाते. सध्या राज्याच्या अनेक भागांत ही स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील प्रमुख जिल्ह्यांतील नीचांकी तापमान (अंश सेल्सिअस):
– धुळे: ५.८
– अहमदनगर: ६.५
– गोंदिया: ८.०
– पुणे: ८.४
– मालेगाव: ८.२
– नागपूर: ८.२
– यवतमाळ: ८.५
– परभणी: ८.९
– बीड: ८.९
– जळगाव: ९.०
– अमरावती: ९.०
– नाशिक: ९.२
– वर्धा: ९.४
– छत्रपती संभाजीनगर: १०.२
– अकोला: १०.१
– महाबळेश्वर: १२.०
– बुलढाणा: १२.२
– सातारा: १२.८
– सांगली: १२.९
– सोलापूर: १३.६
– कोल्हापूर: १४.८
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस थंडीचा जोर कायम राहील. नागरिकांनी गरम कपडे घालणे, विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी काळजी घेणे आवश्यक आहे.


