Maharashtra Political : महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर (MVA) जोरदार निशाणा साधला आहे. महायुतीच्या दणदणीत विजयानंतर बोलताना फडणवीस म्हणाले, “या निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार हे विरोधी पक्षांच्या नेत्यांना आधीच लक्षात आलं होतं.
त्यामुळे ते बाहेरच पडले नाहीत. आता हरल्याचं लोकांना कळलं की, पुढच्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत कार्यकर्त्यांचा मनोबल खचेल, असा विचार करून त्यांनी कमी सहभाग घेतला.”
या निवडणुकीत महायुतीने एकूण २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये २०७ नगराध्यक्ष पदे जिंकली आहेत. यात भाजपाने सर्वाधिक १२९ जागा पटकावल्या, तर शिंदे सेनेने ५३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३७ जागा मिळवल्या. दुसरीकडे, महाविकास आघाडीला फक्त ४४ जागांवर समाधान मानावे लागले.
फडणवीसांनी हा विजय जनतेच्या विश्वासाचे आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले की, भाजपाने सकारात्मक प्रचार केला, कुणावरही वैयक्तिक टीका केली नाही आणि तरीही मोठे यश मिळवले. हा निकाल पुढच्या महापालिका निवडणुकांचा ‘ट्रेलर’ असल्याचा दावाही त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांना टोला लगावत म्हटले की, “घरी बसलेल्यांना असंच होतं. महाविकास आघाडीने जितक्या जागा जिंकल्या, त्यापेक्षाही एकट्या शिवसेनेने जास्त जागा मिळवल्या.”
या निकालाने महायुतीचे राज्यातील वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, आगामी महापालिका निवडणुकांतही असाच कौल मिळेल, असा विश्वास महायुती नेत्यांनी व्यक्त केला आहे.


