इंदापूर : इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते कर्मयोगी शंकरराव पाटील (भाऊ) यांची १०२ वी जयंती इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणातील समाधीस्थळावर श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी भाऊंच्या कार्याचा व व्यक्तिमत्त्वाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. “भाऊंच्या विकासदृष्टीमुळेच इंदापूरच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली,” असे सांगत त्यांनी इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत तसेच बारामती मतदारसंघाच्या विकासात शंकरराव पाटील यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे अधोरेखित केले. समाजहिताची बांधिलकी, सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळा आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व ही भाऊंची ठळक वैशिष्ट्ये होती, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी आणि मान्यवरांनीही शंकरराव पाटील यांना अभिवादन केले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य दत्तात्रय गोळे, डॉ. शिवाजी वीर तसेच विविध शाखांचे शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


