PMC Election: पुणे महानगरपालिकेच्या सत्तेसाठी सुरू असलेल्या ‘काँटे की टक्कर’मध्ये मतदानाच्या दिवशी पुण्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत शहरात ठिकठिकाणी हिंसक संघर्ष पाहायला मिळाला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की, शहरात एकाच दिवसात दंगलीचे २ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक प्रभागांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
प्रभाग ९ मध्ये प्रचंड तणाव; गाड्यांची तोडफोड आणि मारहाण
बाणेर-बालेवाडी परिसरात (प्रभाग ९) सलग दोन मोठ्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. पहिली घटना राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्या सुनेला रात्रीच्या सुमारास झालेल्या मारहाणीची होती, ज्यानंतर बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर, गुरुवारी दुपारी प्रमोद निम्हण यांच्या समर्थकांनी चांदेरे यांच्यावर ‘बोगस मतदार’ आणल्याचा आरोप केल्याने वाद उफाळला. या राड्यात संतप्त कार्यकर्त्यांनी गाड्यांची तोडफोड केली, ज्यामुळे शहरात दंगलीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा – नाशिकमध्ये मतदानाच्या दिवशीच राडा! सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटपाचा आरोप
धायरीत पैशांवरून वाद तर शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये ईव्हीएम गोंधळ
शहरातील इतर भागांतही मतदानाची शांतता भंग पावली. धायरी (प्रभाग ३३) येथे किशोर पोकळे आणि राहुल पाकळे यांच्या समर्थकांमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून जोरदार राडा झाला, जिथे पोलिसांनी हस्तक्षेप करत जमावाला पांगवले. दरम्यान, प्रभाग २५ (ड) मधील शिवाजी मराठा हायस्कूल येथील केंद्रावर ईव्हीएमवरून खळबळजनक प्रकार समोर आला. राष्ट्रवादीचे बटण दाबत असूनही मतदान भाजपला जात आहे, असा आरोप उमेदवाराने केल्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया विस्कळीत झाली आणि केंद्रावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दुपारनंतर मतदारांचा वाढता प्रतिसाद
सकाळी मतदानाचा वेग काहीसा मंद असला तरी दुपारनंतर चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले. दुपारी ३:३० वाजेपर्यंत शहरात सुमारे ४० टक्के इतके मतदान झाले होते. विशेषतः तरुण-तरुणी आणि महिला मतदारांनी दुपारनंतर केंद्रांवर मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे मतदानाचा एकूण टक्का वाढण्यास मदत झाली. राजकीय राडा आणि तांत्रिक तक्रारी असल्या तरी मतदारांमध्ये उत्साह कायम असल्याचे दिसून आले.


