Jalna Dog Attack: लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या जालनाकरांवर १५ जानेवारी रोजी दुपारी एका पिसाळलेल्या कुत्र्याने भीषण हल्ला चढवला. शहरातील सरस्वती भुवन, शनी मंदिर आणि काली मशीद परिसरात या कुत्र्याने अक्षरशः हैदोस घालत १५ हून अधिक नागरिकांना जखमी केले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास जेव्हा मतदानाचा उत्साह शिगेला होता, तेव्हा हा धक्कादायक प्रकार घडला. मतदानासाठी रांगेत उभे असताना आणि रस्त्यावरून जात असताना झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे शहरात मोठी पळापळ आणि घबराट पसरली आहे.
लहान मुलांसह वृद्धही जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक
या पिसाळलेल्या कुत्र्याने समोर येणाऱ्या प्रत्येकाचा क्रूरपणे चावा घेण्यास सुरुवात केली. कुणाचे पाय ओढले, तर कुणाच्या हाताची करंगळी तोडली. या हल्ल्यात केवळ प्रौढच नाही, तर लहान मुले आणि वृद्धांनाही लक्ष्य करण्यात आले. जखमींना तातडीने जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर आशिष देवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १५ जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. शिवराज वेव्हारे, शेख मोबीन, राजश्री कसबे, संगीता साळवे, स्नेहा येमुल, शेख अतिक आणि मोहसिन कुरेशी यांच्यासह इतर अनेक नागरिक या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
हेही वाचा – निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार! निधनानंतर 10 वर्षांनीही अतुल सावेंच्या वडिलांचे नाव मतदार यादीत
महापालिका प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट
मतदानाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे जालना महापालिकेच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असताना प्रशासन नेमकी काय कारवाई करत आहे, असा संतप्त सवाल जखमींच्या नातेवाईकांनी विचारला आहे. सरस्वती भुवन, शनी मंदिर आणि काली मशीद या बाधित क्षेत्रांतील रहिवाशांनी या पिसाळलेल्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मतदानाचा हक्क बजावायला आलो होतो, पण इथे जीवालाच मुकावे लागते की काय, अशी भीती वाटू लागली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका जखमी मतदाराने दिली आहे.


