Unseasonal Rain : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून अवकाळी पावसाचा तडाखा कायम आहे. हवामान विभागाने आजही विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करत धोक्याचा इशारा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 38.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर धुळे येथे नीचांकी 15.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढण्याचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
गडचिरोली, वर्धा, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोदिंया, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांतील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः धुळे जिल्ह्यात तब्बल १८ हजार शेतकऱ्यांचे पीक बाधित झाले असून साक्री, शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यातील २३४ गावांमध्ये सुमारे ११,६२७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये सुमारे ५,९०० हेक्टर कांदा, २,४०० हेक्टर ज्वारी, २,००० हेक्टर बाजरी तसेच फळ पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील हाताशी आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, येवला तालुक्यातील मुखेड परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे टोमॅटो पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. उभी पिके भुईसपाट झाली असून झाडे मोडून पडल्याचे चित्र दिसत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असली तरी सध्या राज्यातील शेतकरी अवकाळीच्या संकटात सापडले आहेत.


