बारामती : बारामती नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांच्या उमेदवारीची शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी असल्याने अनेकजण इच्छुक आहेत. पक्षांतर्गत गटबाजी आणि संघर्ष टाळण्यासाठी अजित पवार यांनी धक्कादायक पावल उचलण्याची शक्यता आहे.
नवीन रचनेनुसार ४१ नगरसेवक निवडून येतील, आणि जय पवार यांचे नाव पुढे आल्यास बारामतीच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची अपेक्षा आहे. या चर्चेला सोशल मीडियावर व्हिडिओनीही उधाण आले आहे.
जय पवारांच्या उमेदवारीची पार्श्वभूमी काय?
अजित पवार यांनी गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत बारामतीतून स्वतः लढण्यास नकार दिला असला, तरी जय पवार यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. आता नगरपरिषद निवडणुकीतही त्याच धर्तीवर जय पवार यांना पुढे आणण्याची चर्चा आहे. जय पवार हे पक्षाच्या युवा नेतृत्वात सक्रिय असून, जनसन्मान यात्रेदरम्यान त्यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढल्या गेल्या होत्या, ज्यात त्यांनी उमेदवारीबाबत संकेत दिले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये नगराध्यक्षपदासाठी किरण गुजर, सचिन सातव, जय पाटील, सुभाष सोमाणी, बबलू देशमुख यांसारखे ज्येष्ठ नेते इच्छुक आहेत. मात्र, नवीन चेहरा देऊन पक्षाला मजबूत करण्यासाठी जय पवार यांचे नाव जोर धरू लागले आहे. कार्यकर्त्यांना तळागाळातील कामकाज असलेल्या उमेदवाराची अपेक्षा असली, तरी पवार कुटुंबाचा वारसा असल्याने हा निर्णय सोपा होणार नाही.
शरद पवार गटाची भूमिका
शरद पवार गटाकडूनही नगराध्यक्षपदासाठी मातब्बर उमेदवार उतरवण्याची तयारी सुरू आहे. युवा नेते युगेंद्र पवार हे चाचणी घेत असून, दोन्ही गट आमनेसामने येण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणे येथेही कुटुंबांतर्गत टक्कर होण्याची चिन्हे दिसत आहेत. शरद पवार गटाची सध्या “वेट अँड वॉच” धोरण आहे, पण निवडणूक जाहीर होताच ते सक्रिय होणार आहेत.


