पुणे: पुणे शहरात शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. एका २६ वर्षीय तरूणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार करून पळ काढला. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (दि. २६) पहाटे साडेपाच वाजता ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांची पथके आरोपीच्या मागावर आहेत. स्वारगेट येथे शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुणे पोलिसांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
26 वर्षाची एक महिला पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. त्यानंतर स्वारगेट एसटी स्टँडच्या परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती. त्यावेळी एका अनोळखी व्यक्तीने महिलेला फलटणला जाणारी एसटी बस दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचे सांगितले. माझी बस याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही, असे त्या मुलीने त्याला सांगितले. मात्र, एकट्या महिलेचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दांत अडकवले.
स्वारगेट एसटी स्टँड परिसरात एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. या ठिकाणी ती सदर महिला गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे असे देखील सांगितले. तू टॉर्च लावून आतमध्ये जा, हीच बस काही वेळात फलटणला निघेल, असे या नराधमाने तिला सांगितले. तो स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्यानंतर त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तो तिथून पसार झाला. घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितला. सध्या पोलिसांची विविध पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे.


