पुणे: पुणे शहरातील हडपसरमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे . एका मुलाने गुरुवारी (दि. २९) रात्री मस्तीत पिस्तूलमधून गोळी झाडली, ती गोळी थेट त्याच्या भावाला लागली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सदर प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळी झाडणाऱ्या मुलाचे राजकीय पक्षासोबत संबंध आहेत.
मस्तीमध्ये पिस्तुल लोड करून हवेत गोळी झाडताना त्या तरूणाच्या मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. हा गोळीबार गावठी पिस्तुलातून झाल्याची माहिती समोर आली आहे. वैभव श्रावण गवळी (वय 20) असे या गोळीबारात जखमी झालेल्या, तर सुमित खवळे असे गोळीबार करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी वैभव श्रावण गवळी (वय 20) हा त्याचा मावस भाऊ सुमित खवळे आणि बसवराज सुतार यांच्यासह गुरुवारी रात्री 08.15 वाजताच्या सुमारास दुचाकीवरून हडपसरमधील पांढरेमळा कॅनॉल येथे वाढदिवसाकरिता जात होता. यावेळी सुमितने त्याच्याजवळ अवैधरित्या बाळगलेल्या गावठी कट्ट्यामधून गोळी सुटून त्याच्या समोरच्या गाडीवर असलेल्या वैभव गवळी याच्या डाव्या खांद्यावर लागली आणि यात तो जखमी झाला.
सध्या वैभववर ससून हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून तो सुस्थितीत आहे. जखमी वैभव गवळी व सुमित खवळे हे एकमेकांचे मावसभाऊ आहेत. पोलिसांनी वापरलेली दुचाकी व गावठी कट्टा जप्त केला आहे. गुन्हा नोंद करून पोलिस पुढील तपास करीत आहेत.


