Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरातची (Ashok Kharat) सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात हा तपास होत असून काही अधिकारी व राजकीय नेत्यांचेही फोटो खरातसोबत आढळून आल्याने राजकीय वर्तुळातच जोरदार चर्चा आहे. त्यातच, आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी विविध राजकीय नेत्यांसोबतचे फोटो दाखवले. तर, रुपाली चाकणकर (Rupali chakankar) यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. रुपाली चाकणकर यांनी गायक, दिग्दर्शक अनु मलिकला मी टू प्रकरणी क्लीन चीन दिल्यामुळेच त्यांच्या मुलाला चित्रपटात काम मिळाल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटले.
सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत अशोक खरातचे 10 फोटो दाखवले. त्यामध्ये माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर तसेच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातसोबत जास्त फोटो आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजप नेते अतुल सावे आणि शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांचेही अशोक खरातसोबतचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच, रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत.
मी मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे, दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचे फोन रेकॉर्ड, अर्थिक खाते चेक करावे. मी यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेला भेटणार आहे. चौधरी जे तटकरेसोबत अनेक व्यवहारात आहेत, ते कोकणात चाकणकर यांच्यासोबत आहेत. साडेचारशे, पाचशे कोटींचा प्रोजेक्ट आहे, येवढी ताकद येते कुठून? असा सवाल अंधारे यांनी विचारला. तसेच, मी टू चळवळ सुरू असताना गायक आणि दिग्दर्शक अनु मलिक यांच्याविरोधात महिलांनी तक्रार केली होती. त्यावेळी रुपाली चाकणकर यांनी अनु मलिकला क्लीन चिट दिली होती, त्यामुळेच सोहम चाकणकर याला अनु मलिकांच्या फिल्ममध्ये काम मिळले होते, सोहम हा रुपाली चाकणकर यांचा मुलगा आहे, असेही सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.
रुपाली चाकणकरांनी डील केली
अनु मलिक यांच्याविरुद्ध सिनेसृष्टीतील दोन ते तीन महिलांनी तक्रार दिली होती. अनु मलिक यांच्या प्रोडक्शनचा एक चित्रपट तयार झाला, त्या चित्रपटात रुपाली चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकर याला काम मिळालं. रुपाली चाकणकर जर अशी डील करत असतील तर हे वाईट आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत फोटोच दाखवले. तसेच, महिलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, त्यामुळे पोलीस प्रशासनाला देखील अनेक अडचणी येत आहेत. मात्र, IPS तेजस्वी सातपुते त्यांचं काम करत आहेत, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.


