Municipal Election 2026: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अंतिम दिवस राजकीय भूकंपाने गाजला. राज्यातील १४ प्रमुख महानगरपालिकांमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील युती फिस्कटली असून, हे दोन्ही पक्ष आता एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकणार आहेत. दरम्यान, मुंबई आणि ठाण्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागांवर मात्र दोन्ही पक्षांनी मैत्री कायम राखली आहे.
कुठे फिस्कटलं युतीचं गणित?
जागावाटपावरून झालेली ओढाताण आणि स्थानिक नेत्यांमधील मतभेद यामुळे तब्बल १४ महापालिकांमध्ये महायुतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, सांगली, अकोला, धुळे, उल्हासनगर, नांदेड, अमरावती, मालेगाव आणि जालना येथे भाजप आणि शिंदे गट स्वतंत्रपणे लढणार आहेत. या शहरांमध्ये आता युतीचे दोन पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ‘फ्रेंडली फाईट’ की ‘काटे की टक्कर’ होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा – PMC Election: मोठी बातमी! मारणेनंतर आता अजित पवारांकडून आंदेकर टोळीच्या दोन महिलांना तिकीट
मुंबई-ठाण्यात युती; पण अजित पवार बाहेर?
राज्याची आर्थिक राजधानी मुंबई आणि शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपने एकनाथ शिंदेंशी हातमिळवणी कायम ठेवली आहे. मात्र, येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या युतीपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई-ठाण्यात महायुतीचे समीकरण पूर्णपणे वेगळे असून, अजित पवार गट येथे स्वतंत्र ताकद आजमावणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
निष्ठावंतांची गळचेपी आणि बंडखोरीचा इशारा
दरम्यान, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांत अंतर्गत वादाचा भडका उडाला आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्या आयाराम नेत्यांना तिकीट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष आहे. काही नेत्यांनी तर पक्ष कार्यालयाबाहेरच संताप व्यक्त करत अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत.


