PMC Election: निवडणूक लढवणे हा मूलभूत अधिकार आहे, या न्यायालयाच्या निरीक्षणाचा आधार घेत, पुण्याच्या गुन्हेगारी विश्वातील आंदेकर टोळीने थेट राजकारणाच्या मुख्य प्रवाहात उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आंदेकर कुटुंबातील सदस्यांना ‘एबी’ फॉर्म देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, या निर्णयाने पुण्याच्या राजकारणात वादाचे वादळ निर्माण झाले आहे.
वकिलांमार्फत अर्ज दाखल
अनेक तर्क-वितर्कांनंतर अखेर हे स्पष्ट झाले आहे की, आंदेकर कुटुंबीय ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या तिघांनीही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. सध्या अटकेत असलेल्या बंडू आंदेकरला न्यायालयाने काही अटींसह अर्ज भरण्यास संमती दिली होती. त्यानुसार, आज वकिलांच्या माध्यमातून त्यांचे अधिकृत ‘एबी’ फॉर्म सादर करण्यात आले.
अजित पवार गटाची ‘गुप्त’ रणनीती
आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे पक्षावर टीका होण्याची शक्यता होती, म्हणूनच राष्ट्रवादीने या उमेदवारीबाबत अत्यंत गुप्तता पाळली होती. कोणतीही अधिकृत घोषणा किंवा गाजावाजा न करता, थेट शेवटच्या दिवशी अर्ज भरून विरोधकांना संधीच दिली नाही. मात्र, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पक्षाने उमेदवारी दिल्याने गुन्हेगारीमुक्त पुणे या घोषणेचे काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
स्वतःच्या मुलीचा टोकाचा विरोध आणि आत्मदहनाचा इशारा
या उमेदवारीला घराबाहेरूनच नव्हे, तर घरातूनच मोठा विरोध झाला आहे. बंडू आंदेकर यांची मुलगी (ज्याचा खून झाला त्या आयुष कोमकरची आई) हिने अजित पवारांना जाहीर इशारा दिला होता. आंदेकर टोळीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. माझ्या पोटच्या गोळ्याची हत्या करणाऱ्यांना जर पक्षाने उमेदवारी दिली, तर मी राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा इशारा कोमकर यांच्या आईने दिला होता. मात्र, हा इशारा धुडकावून पक्षाने आंदेकरांच्या हाती उमेदवारीचे सूत्रे सोपवली आहेत.


