Mayor Reservation Draw: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर काल अखेर निकाल स्पष्ट झाले आहेत. मुंबईसह पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली असली, तरी आता सर्वांचे डोळे ‘महापौरपदाच्या आरक्षणाकडे’ लागले आहेत. जोपर्यंत हे आरक्षण निश्चित होत नाही, तोपर्यंत विजयी उमेदवारांपैकी कोणाच्या नशिबात महापौराची खुर्ची आहे, हे स्पष्ट होणार नाही.
पुढील आठवड्यात समजणार आरक्षणाचे गुपित
नगरविकास विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बहुतांश महापालिकांना नवीन महापौर मिळण्याची शक्यता आहे. चक्राकार (Rotation) पद्धतीने अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि महिला अशा प्रवर्गांनुसार ही सोडत निघेल. मागील वेळेस जे आरक्षण होते, ते वगळून इतर गटांना यंदा संधी दिली जाणार आहे.
मुंबईत भाजपचे वर्चस्व; ऐतिहासिक निकालाची नोंद
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या २२७ जागांच्या निकालात महायुतीने ११८ जागांसह बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप ८९ जागांसह अव्वल स्थानी आहे, त्यामुळे मुंबईचा महापौर भाजपचाच होणार, हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागा मिळाल्या आहेत, तर शिंदे गटाने २९ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या पदरात २४ जागा पडल्या आहेत.
नगरसेवकांमध्ये धाकधूक
निवडून आलेले अनेक दिग्गज नगरसेवक सध्या महापौरपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, आरक्षण कोणत्या गटासाठी सुटते, यावरच त्यांची स्वप्ने अवलंबून आहेत. जर एखादा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी राखीव झाला, तर चुरस अधिक वाढणार आहे.


