Pune Election Result: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने ‘वुमन पॉवर’च्या जोरावर मोठे यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘लाडकी बहीण’ योजनेचा जो प्रभाव दिसला, त्याचीच पुनरावृत्ती आता महापालिका निवडणुकीत पाहायला मिळत आहे. भाजपने मैदानात उतरवलेल्या ९२ महिला उमेदवारांपैकी ६७ महिलांनी दणदणीत विजय मिळवत पालिकेत आपले स्थान पक्के केले आहे.
आरक्षणापलीकडे जाऊन महिलांचे वर्चस्व
पुणे महानगरपालिकेच्या एकूण १६५ जागांपैकी ८३ जागा महिलांसाठी आरक्षित होत्या. मात्र, भाजपने केवळ आरक्षित जागांवरच समाधान न मानता, सर्वसाधारण (Open) गटातूनही महिलांना संधी दिली होती. आरक्षणाशिवाय खुल्या प्रवर्गातून लढलेल्या ९ महिलांनी (४ सर्वसाधारण आणि ५ अनुसूचित जाती गट) पुरुषांच्या जागेवर विजय मिळवून इतिहास घडवला आहे. पल्लवी जावळे, विणा घोष, अर्चना जगताप, संगीता दांगट, रंजना टिळेकर आणि निवेदिता एकबोटे यांसारख्या महिला नेत्यांनी अटीतटीच्या लढतीत विजय साकारला आहे.
‘या’ प्रभागांमध्ये महिला मतदारांनी फिरवला निकालाचा कौल
काही प्रभागांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या लक्षणीय होती, ज्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचे दिसून येते. प्रामुख्याने खालील भागात महिला मतदारांचा मोठा प्रभाव राहिला:
- प्रभाग १२ (शिवाजीनगर कॉलनी मॉडेल)
- प्रभाग १८ (वानवडी-साळुंखे विहार)
- प्रभाग २३ (रविवार पेठ-नाना पेठ)
- प्रभाग २९ (डेक्कन जिमखाना)
कोंढवा-येवलेवाडीत भाजपचा नवा प्रयोग
भाजपने यंदा कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी प्रभागात एक वेगळा प्रयोग केला होता. येथे चारही जागांवर महिलांनाच उमेदवारी देण्यात आली होती. आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांनी सर्वसाधारण प्रभागातून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. भाजपच्या ६७ महिला विजयी झाल्या असतानाच, दुसरीकडे विरोधी पक्षांच्या एकूण २० महिला उमेदवारांना विजयाचा गुलाल उधळता आला आहे. एकूणच, नव्या महापालिकेत महिला नगरसेविकांची संख्या लक्षणीय असल्याने शहराच्या विकासकामांत महिलांचे धोरणात्मक वर्चस्व पाहायला मिळणार आहे.


