Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या. तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. ‘मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांच्या विरोधात लढत राहणार’, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काही जण नाराज झाले. एक दिवस त्यांनी नाराजी व्यक्त केली, पण दुसऱ्या दिवसापासून ते पुन्हा कामाला लागले, याला म्हणतात निष्ठावंत. पण काही जण नाराज झाले आणि बंडखोरी केली. काही जणांना सर्व काही दिलं तरी नाराज. मी कोणाचंही नाव घेत नाही, पण हे सगळीकडे आहे. जसं तुम्हाला नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार आहे, तसं मला नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही का? पण मी नाराज होऊ शकत नाही. कारण मला सर्व शिवसैनिक सारखे आहेत”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं
“जेव्हा माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं. कारण यांना कळतं का की तुम्ही कोणासाठी काय करत आहात? जेव्हा ही लढाई आपण लढत असतो तेव्हा काही माणसं विकली जातात तेव्हा वाईट वाटतं आणि असं वाटतं की या लढाईला काही अर्थ आहे की नाही? पण १०० पराभव झाले तरी एक मोठा विजय सुख देऊन जातो”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
‘शिवसेना हा फक्त पक्ष नाही तर विचार’
“भाजपाला असं वाटत असेल की शिवसेना ते संपवतील. मात्र, शिवसेना ते कधीही संपवू शकणार नाहीत, कारण शिवसेना हा फक्त पक्ष नाही तर विचार आहे. शिवसेना ही अन्याग्रस्तांच्या काळजात पेटलेली मशाल आहे. शिवसेनेचा जन्म हा घरे पेटवण्यासाठी झालेला नाही तर घरातील चूल पेटवण्यासाठी झालेला आहे. एक गद्दार गेला असेल, पण एका गद्दाराची जागा चार निष्ठावतांनी घेतली हे आपल्याला येणाऱ्या काळात दाखवून द्यायचं आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
शाखेत मी पुन्हा जाणार
“मुंबईतील आपल्या प्रत्येक शाखेत मी पुन्हा जाणार आहे. ज्या ठिकाणी आपण जिंकलो आहोत, त्या ठिकाणी तर जाणारच आहे, पण ज्या ठिकाणी पराभव झाला त्या ठिकाणी देखील जाणार आहे. मी आपल्याला सर्वांना आणखी एक आवाहन करतो की जय महाराष्ट्रचा उद्घोष पुन्हा एकदा जोरदार सुरू करा”, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं.
‘मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा…’
“बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांना जगायचं कसं हे शिकवलं. कारण जर जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर जसं पूर्वी गुलामगिरीत आपण राहत होतो तसं या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून आयुष्य जगावं लागेल. मात्र, गुलामीचं जीवन आपल्याला कदापी शक्य नाही. मेलो तरी बेहत्तर, पण त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून आयुष्यात कधी जगणार नाही अशी शपथ सर्वांनी घेतली पाहिजे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर टीका केली.


