Accident News : नवीन वर्षाच्या पहिल्याच शनिवारी भंडारा जिल्ह्यातील चांदपूर येथील जागृत हनुमान देवस्थान परिसरात एक थरारक अपघात घडला. दर्शनासाठी आलेल्या भाविकाची कार अचानक अनियंत्रित होऊन थेट तलावात कोसळली. मात्र, प्रसंगावधान राखत कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी आणि एका स्थानिक तरुणाने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेत दोन जणांचे प्राण वाचवले.
गोंदिया जिल्ह्यातील भजेपार येथील रहिवासी श्रीकृष्ण नथू रहांगडाले हे आपल्या कुटुंबासह चांदपूर येथे दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून परतीच्या मार्गावर असताना पार्किंगमधून सॅन्ट्रो कार बाहेर काढत असताना हा अपघात झाला. कार वळवताना अचानक एक्सीलेटरवर पाय जोरात दाबला गेल्याने वाहनाचा वेग वाढला आणि कार थेट समोरच्या तलावात जाऊन पडली.
कार पाण्यात बुडताना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. याच वेळी गर्दी नियंत्रणासाठी तैनात असलेले सिहोरा पोलीस स्टेशनचे हवालदार सुनील कासदा, पोलीस शिपाई रवींद्र सव्वालाखे आणि स्थानिक तरुण साहिल कोहळे (वय १७) यांनी क्षणाचाही विलंब न लावता तलावात उड्या घेतल्या. पाण्याची खोली लक्षात घेत त्यांनी बुडत्या कारपर्यंत पोहत जाऊन चालक श्रीकृष्ण रहांगडाले आणि त्यांचा मुलगा ओम रहांगडाले यांना सुखरूप बाहेर काढले.
दोघांची सुटका झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाण्यात बुडालेली कार बाहेर काढण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही, मात्र वाहनाचे नुकसान झाले आहे.
गर्दीच्या ठिकाणी दाखवलेल्या धैर्यामुळे मोठा अनर्थ टळला असून, पोलिस हवालदार सुनील कासदा, रवींद्र सव्वालाखे आणि तरुण साहिल कोहळे यांच्या धाडसाचे परिसरातून तसेच पोलीस प्रशासनाकडून जोरदार कौतुक होत आहे.


