अमरावती : साताऱ्यातील फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या संतापजनक आत्महत्येनंतर आता अमरावतीतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडका गावात राहणाऱ्या २१ वर्षीय श्रुती झेले या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. धामणगाव रेल्वे येथील आदर्श महाविद्यालयात बीए दुसऱ्या वर्षी शिकणारी श्रुती ही कुटुंबातील एकमेव मुलगी होती. या घटनेने गावात खळबळ उडाली असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रुती ही २६ ऑक्टोबर रोजी दुपारी घरी एकटी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या कुटुंबीयांनी घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली. या घटनेची महती तात्काळ पोलिसांना कळवली. त्यानंतर अमरावती ग्रामीण पोलीस आणि धामणगाव रेल्वे पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्रुतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण समजले नसले तरी, कुटुंबीयांनी सांगितले की, श्रुती ही अभ्यासात हुशार आणि शांत स्वभावाची होती. तिच्या खोलीतून कोणताही सुसाईड नोट किंवा संशयास्पद वस्तू सापडली नाही. पोलिस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने साक्षीदारांची चौकशी सुरू केली असून, घातपाती मार्गाने झालेल्या घटनेची शक्यताही तपासली जात आहे.


