अकोला : ऐन निवडणूक काळात शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने अकोल्यातील खासगी आयकॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी त्यांना नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला.
यानंतर गुलाबराव गावंडे यांना नागपूरच्या अर्नेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज त्यांच्यावर सुमारे तीन तासांची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज आढळून आले होते, ती यशस्वीरित्या काढण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांचे सुपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी दिली आहे.
अकोला शहरातील कौलखेड येथील रहिवासी असलेले गुलाबराव गावंडे वादळी नेतृत्वासाठी ओळखले जातात. त्यांनी तीन वेळा वेगवेगळ्या मतदारसंघातून आमदारकी भूषवली असून मनोहर जोशी मंत्रिमंडळात चार वर्षे राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने समर्थकांनी दिलासा व्यक्त केला आहे.


