अमरावती : अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, चांदूर रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्षीय शाळकरी मुलीवर पाच तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष अत्याचारामुळे पीडिता तीन महिन्यांची गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेतून घरी जात असताना साईनाथ (१८) आणि अजिंक्य (१८) या दोघांनी तिला रस्त्यात अडवले. बदनामीची भीती दाखवत तिला विरूळ रॉघे मार्गावरील एका निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आला.
यानंतर कार्तिक शेलोकार (१८), साहिल (१८) आणि संकेत काळे (२२) हे तिघे घटनास्थळी आले. त्यांनीही पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला. आरोपी सतत धमक्या देत पीडितेला गप्प राहण्यास भाग पाडत होते. या सातत्यपूर्ण छळामुळे पीडितेचे मानसिक व शारीरिक आरोग्य पूर्णपणे खचले होते.
या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने धाडस करत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी पाचही आरोपींविरोधात पोक्सो कायदा तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाले होते, मात्र पोलिसांनी शोधमोहीम राबवून सर्व आरोपींना अटक केली आहे.
पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता ती तीन महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


