जळगाव : महायुतीतील नेत्यांच्या शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण तापले असताना, आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनीही असेच एक विधान केले आहे. ‘दुष्काळ पडला तरी लोक पुढाऱ्यांना शिव्या देतात आणि दुष्काळ नसला तरीही शिव्या देतात. शिव्या ऐकणे हा पुढाऱ्यांचा धंदाच आहे’, असे म्हणत पाटील यांनी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर उपहास केल्याची चर्चा आहे. या वक्तव्यामुळे लोकांनी पुढाऱ्यांना जाब विचारू नये का? असा सवाल उपस्थित होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे खानदेश शिक्षण मंडळाने आयोजित कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले, ‘लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात आणि दुष्काळ नाही पडला तरीही पुढाऱ्यांना शिव्या देतात. शिव्या ऐकणं हाच आम्हा पुढाऱ्यांचा धंदा आहे. त्यामुळे ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावं.’ हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे.
मागील काही दिवसांत राष्ट्रवादीचे माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या शेतकरी-कर्जमाफीवरच्या विधानांमुळे महायुती अडचणीत सापडली होती. कोकाटे यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर बाबासाहेब पाटील यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. अशा पार्श्वभूमीवर पाटील यांचे हे विधान महायुतीतील अंतर्गत तणाव वाढवण्याचे काम करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


