चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या राजकारणाला अखेर मंगळवारी नाट्यमय वळण मिळाले. गेल्या काही दिवसांपासून त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या महापौर निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने थेट भाजपला पाठिंबा देत काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला आहे. या निर्णयामुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी सकाळी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे नेते संदीप गिऱ्हे यांच्यात बैठक झाली होती. मात्र, या बैठकीत महापौरपदावरून तीव्र मतभेद झाल्याने खटके उडाले. बैठकीतून संदीप गिऱ्हे नाराज होऊन बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची अधिकृत घोषणा केली आणि सत्तानाट्याचा शेवट झाला.
भाजप आणि ठाकरे गटामध्ये महापौरपद सव्वा-सव्वा वर्षांच्या प्रत्येकी दोन टर्ममध्ये वाटून घेण्यावर एकमत झाले आहे. ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, पहिली सव्वा वर्षे भाजपचा महापौर असेल, तर त्यानंतर सव्वा वर्षे ठाकरे गटाचा महापौर असेल. ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे संपूर्ण पाच वर्षे उपमहापौरपद सांभाळतील. तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद पहिल्या आणि चौथ्या वर्षी ठाकरे गटाकडे राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची शक्यता वर्तवली जात होती. सकाळीच खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची भूमिका भाजपला सत्ता मिळू द्यायची नाही, अशी असल्याचे सूचित केले होते. मात्र, काही तासांतच ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याची घोषणा झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या निर्णयाबाबत माहिती देताना भाजप नेते किशोर जोरगेवार म्हणाले, “शिवसेनेच्या मागणीमुळे चर्चा अडकल्या होत्या. भाजपकडे २४ नगरसेवक असल्याने महापौरपद देण्यास आमचे नेते तयार नव्हते. मात्र, चंद्रपूरच्या विकासाला प्राधान्य देत ठाकरे गटासोबत महापौरपदाची वाटणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.”
ठाकरे गटाचे नेते संदीप गिऱ्हे यांनीही भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “महापौरपद मिळावे, ही आमची ठाम भूमिका होती. काँग्रेसशी चर्चा सुरू होत्या, मात्र पाच वर्षांत कुठेही महापौरपद देण्यास ते तयार नव्हते. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने आम्ही भाजपशी चर्चा केली. किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवादानंतर हा फॉर्म्युला ठरवण्यात आला.”
चंद्रपूर महानगरपालिकेतील संख्याबळ
एकूण सदस्य : 66
काँग्रेस : 27
जनविकास सेना : 3
भाजप : 23
शिंदे गट शिवसेना : 1
उद्धव ठाकरे गट शिवसेना : 6
वंचित : 2
बसपा : 1
अपक्ष (काँग्रेस बंडखोर) : 2
एमआयएम : 1
या राजकीय घडामोडींमुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासमीकरण पूर्णपणे बदलले असून, येत्या काळात त्याचे राजकीय पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


