Vidarbha Heat Wave : विदर्भात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. सोमवारी अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमानाने 46 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला.
नागपूरमध्ये मंगळवारी तापमान 45.5 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. याचदरम्यान गेल्या 24 तासांत शहरात तीन व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली असून, उष्माघातामुळे हे मृत्यू झाले असावेत असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लकडगंज, गणेशपेठ आणि राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
यामध्ये सुमारे 40 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला आणि 45 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या तिघांचे मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आले होते. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय असला तरी शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अकोल्यातही उष्माघाताचा संशय
दरम्यान, अकोला शहरातही उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जुन्या शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असदगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला. राजेश्रीसिंग ठाकूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतदेहावर कोणत्याही मारहाणीच्या किंवा जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. मात्र तीव्र उन्हामुळे नाकातून रक्तस्त्राव झाल्याने उष्माघाताचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
अकोल्यात तापमानाचा उच्चांक
अकोला जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून तापमान सातत्याने 45 अंशांच्या पुढे नोंदवले जात आहे.
12 मे : 45.6
13 मे : 45.9
14 मे : 45.9
15 मे : 45.4
16 मे : 45.4
17 मे : 46
18 मे : 46.3
19 मे : 45.3
नागरिकांना प्रशासनाचा इशारा
हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात फारसा बदल होणार नसल्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 3 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच हलक्या रंगाचे सुती कपडे वापरणे, भरपूर पाणी पिणे, ओआरएस, ताक आणि लिंबूपाणी सेवन करून शरीर हायड्रेट ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


