School Reopens : उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बहुतांश शाळा १५ जूनपासून सुरू होणार असल्या तरी विदर्भातील विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस सुट्टी मिळणार आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विदर्भातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा २२ जून ते ३० जून या कालावधीत सकाळच्या सत्रात भरविण्यात येणार आहेत. त्यानंतर १ जुलै २०२६ पासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू होतील. विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित सर्व शाळा १५ जूनपासून नियमित वेळेत सुरू राहतील.
यंदा राज्यात तीव्र उष्णतेची लाट पाहायला मिळाली. अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. विशेषतः विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसेच उष्माघातामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, तर नागपूर आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मान्सून विदर्भात दाखल होण्यासाठी अद्याप काही दिवस शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.


