Maharashtra Rain : उकाड्याने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून हवामान विभागाने आज राज्यातील ३० जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बीड, परभणी, लातूर, धाराशीव, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, मान्सूनने पूर्वोत्तर भारतातील सर्व राज्ये, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयीन भागात प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण तयार झाले असून येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील आणखी काही भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


