नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज (सोमवार) नागपूर येथे सुरुवात होत आहे. १४ डिसेंबरदरम्यान चालणारे हे आठवडाभराचे अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. विरोधी पक्ष सरकारला पीक कर्जमाफी, भ्रष्टाचार, मतचोरी, दुबार मतदारांसह अनेक ज्वलंत मुद्द्यांवर घेरण्याच्या तयारीत आहेत, तर सत्ताधारी पक्षाकडूनही तोडीस तोड उत्तर देण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळाची शक्यता
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपूर शहरात चार मोठे मोर्चे विधानभवनाकडे कूच करणार आहेत. याशिवाय यशवंत स्टेडियम येथे विविध संघटनांकडून १५ धरणे आंदोलने होणार आहेत. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दोघांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण आहे.
ड्रोन, AI, हेल्मेट कॅमेऱ्याची करडी नजर
मोर्चे आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहराच्या चारही दिशांनी येणाऱ्या मोर्चेकऱ्यांवर सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे आणि पोलिसांच्या हेल्मेट कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच AI-आधारित मॉनिटरिंग यंत्रणेचा वापर करून संवेदनशील भागावर सतत नजर ठेवली जाणार आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर जैश-ए-मोहम्मदकडून संभाव्य घातपाताचा गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्याने उपराजधानी नागपूर पूर्णपणे हायअलर्टवर आहे. RSS मुख्यालय (महाल), रेशीमबाग स्मृतिभवन, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या भागात विशेष सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
१० हजार पोलिसांचा बंदोबस्त
विधानभवन परिसरात फोर्स वनच्या तुकड्या दाखल झाल्या आहेत. राज्यभरातून ३ हजाराहून अधिक अतिरिक्त पोलीस कर्मचारी नागपुरात तैनात करण्यात आले आहेत. SRPF च्या ५ तुकड्या, होमगार्डसह एकूण १० हजार पोलिसांचा फौजफाटा उपराजधानीत तैनात आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकांनी मुख्य ठिकाणांची सखोल तपासणी केली आहे.


