Vikas Gogawale: नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणात गेल्या दीड महिन्यापासून बेपत्ता असलेले शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले अखेर आज पोलिसांना शरण आले. न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वीच त्यांनी महाड पोलीस ठाण्यात हजेरी लावली.
गुप्तता पाळत पोलीस ठाण्यात प्रवेश
गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारे विकास गोगावले आज सकाळी अत्यंत गोपनीय पद्धतीने महाड पोलीस ठाण्यात दाखल झाले. कोणालाही सुगावा लागू नये यासाठी त्यांनी मुख्य प्रवेशद्वाराऐवजी मागच्या दाराने पोलीस ठाण्यात प्रवेश केला आणि शरणागती पत्करली. सध्या त्यांची पोलीस चौकशी सुरू असून, पोलीस ठाण्याबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
डिसेंबर २०२५ मध्ये महाड नगरपालिकेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे आणि विकास गोगावले यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. या संघर्षात वाहनांची तोडफोड आणि परस्पर विरोधी हल्ले झाले होते. याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यापासून २ डिसेंबरपासून विकास गोगावले फरार होते.
उच्च न्यायालयाचे ताशेरे आणि पोलिसांची कारवाई
विकास गोगावले सापडत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. “मंत्र्यांची मुले का सापडत नाहीत?” असा रोखठोक सवाल करत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांना आज सकाळी ११ वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले होते.
आज जामीन अर्जावर सुनावणी
विकास गोगावले यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. न्यायालय त्यांना दिलासा देऊन जामीन मंजूर करणार? की त्यांची रवानगी पोलीस कोठडीत होणार? याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. थोड्याच वेळात पोलीस त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.


