मोहोळ (सोलापूर) : पनवेलहून अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. मोहोळ तालुक्यातील देवडी पाटी परिसरात शनिवारी रात्री एरटिका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
एमएच-४६ झेड ४५३६ क्रमांकाची एरटिका कार झाडावर जोरदार आदळल्याने हा अपघात झाला. कार चालकाचा अचानक ताबा सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि मृतदेह चेंदामेंदा अवस्थेत बाहेर काढावे लागले.
मृतांमध्ये ३ पुरुष आणि २ महिलांचा समावेश आहे. जखमी महिला ज्योती जयदास टाकले (रा. सेक्टर ७, पनवेल) या असून त्यांच्यावर मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त सर्व भाविक एकमेकांचे मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मोहोळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, पोलीस निरीक्षक शेडगे पुढील तपास करत आहेत. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर आलेल्या या संकटामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


