पाचगणी (जि. सातारा) : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचगणीत गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष प्रभू कांबळे यांचे अंगावर भस्म फासलेल्या ‘नागा साधू’च्या वेशातील टोळीकडून थेट अपहरणाचा प्रयत्न झाला. उमेदवाराने सतर्कता दाखवल्याने व झटापटीत गाडीची काच फुटल्याने टोळी पसार झाली. या प्रकरणी पाचगणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.
संतोष कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते घराच्या वरच्या मजल्यावर झोपले असताना घराबाहेर बोलण्याचा आवाज आला. खाली उतरून पाहताच दोघे नागा साधू त्यांच्याकडे येत होते, तर एका गाडीत आणखी काही जण बसलेले दिसले.
साधूंनी “तुम्ही निवडणूक लढत आहात ना? महाराज गाडीत बसले आहेत, त्यांचा आशीर्वाद घ्यायला चला,” असे सांगितले. संतोष यांना संशय आल्याने नकार दिला. त्यानंतर दोघांनी त्यांना ओढत गाडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. झटापटीत गाडीची काच फुटली आणि आरडाओरड झाल्याने टोळीने गाडीतून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठले. परिसरातील सीसीटीव्ही, टोलनाक्यावरील फूटेज तपासले जात असून, लॉज-हॉटेलमधील नोंदीही खणून काढल्या जात आहेत. उमेदवाराला निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दबाव टाकण्याचा हा प्रयत्न असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


