वैराग (सोलापूर): मागच्या साधारण चार दिवसांत वाघोबाचे दर्शन न झाल्याने वैराग परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला होता. त्यातून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला होता. मात्र, गुरुवारी वैराग शिवारातील एका वस्तीच्या ठिकाणी साधारण ८-९ महिन्यांच्या म्हशीच्या रेडक्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
विशेष म्हणजे येथील रेडक्वावर केलेला हल्ला हा बिबट्याचाच असल्याचे आढळून आलेल्या ठशांवरून बार्शी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता.१६) सांगितले. या घटनेसंबंधी पंचनामा केला असून वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविल्याची माहितीदेखील देण्यात आली. मागच्या काही दिवसांपूर्वी वैरागसह परिसरातील राळेरास, सासुरे या गावच्या शिवारात पट्टेदार वाघाने धुमाकुळ घालून बैल, गाईचे वासरु तसेच म्हशीचे रेडकू यांच्यावर हल्ले केले होते. यामुळे या भागामधील नागरिकांमध्ये वाघाबद्दल प्रचंड दशहत निर्माण झाली होती. दशहतीच्या वातावरणामधून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तथापि, त्यावर काही दिवस गेले. यादरम्यान वाघ किंवा बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा नव्हती.
मात्र, गुरुवारी वैराग शिवारातील राहुल हणमंत भोसले यांच्या म्हशीच्या रेडकावर हल्ला करुन त्याला मृत्यूमुखी पाडल्याची घटना समोर आली आहे. हा हल्ला बिबट्याने केल्याचेदेखील उघड झाले आहे. वैराग आणि परिसरात वाघ तसेच बिबट्या या हिंस्त्र प्राण्यांकडून हल्ले होत असून त्यांच्या अधिवासातून या भागात दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. तेव्हा हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचा मुद्दा पुन्हा येथे ऐरणीवर आला आहे.


